महिला सक्षमीकरणासाठी शेती हाच पर्याय 

March 20th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

पूजा खानविलकर (महिला किसान), कोरले,ता. देवगड  
 
 
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला किसान सशक्तीकरण परियोजना उपजीविका अंतर्गत महिला किसान अभ्यास दौऱ्याला जाण्याचा योग आला आणि शेतीविषयक कल्पनाच बदलून गेल्या. आमच्या कोकणातील शेतीतही पैसा पिकू शकतो याची जाणीव झाली.  कमी खर्चिक असलेली सेंद्रिय शेती करतानाच, त्यातून चांगला नफा मिळवणारे फार्म पाहताना, आमच्याकडे आहे मात्र त्याचा योग्य वापर आणि नियोजन केले जात नसल्याचे लक्षात आले. ७ जानेवारी ते १० जानेवारी २०१८ दरम्यान हा दौरा होता. कोल्हापूर येथील कणेरी मठ, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र आणि पुणे हिंजवडी येथील अभिनव फार्मर क्लबचा शाश्वत शेतीचा प्रयोग पाहणे हि या दौऱ्यातील प्रमुख ठिकाणे होती. सोबतीला होते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिकारी  शिवाजी खरात (जिल्हा व्यवस्थापक उपजीविका ), प्रभाकर गावडे ( जिल्हा व्यवस्थापक क्षमता बांधणी) या दोन प्रमुख अधिकाऱ्यांसोबत देवगड तालुक्यातील प्रभाग समन्वयक शरद थोरावत,  कुडाळ तालुक्यातील ओरसच्या प्रभाग समन्वयक  तेजस्विनी कांबळी, सावंतवाडीच्या प्रभाग समन्वयक ममता रेडकर आणि महिला भगिनी मिळून एकूण ८१ लोकांचा समूह. सोबतच्या अधिकाऱ्यांकडून मिळणारी माहिती समजून घेताना आणि प्रत्यक्षातील शेती क्षेत्रात तिथल्या लोकांनी साधलेला विकास पाहता महिलांच्या सक्षमीकरणासाठी शेती हाच उत्तम उपाय असल्याचे मनाला पटू लागले होते. 
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला भगिनी ७ जानेवारीला सकाळी तालुक्याच्या ठिकाणी जमल्या आणि दोन एस.टी बसणे हि अभ्यास दिंडी शाश्वत शेती विकासाच्या शोधात निघाली. या दिंडीचे पहिले ठिकाण होते कोल्हापूर येथील कणेरी मठ. साधू, संत यांचे मठ आपल्याला माहित आहेत, हा देखील एका महान व्यक्तीने स्थापन केलेला मठ मात्र येथे शाश्वत शेती शास्त्राचे धडे दिले जातात.येथे  सिध्दगिरी म्युझियम पाहण्यासारखे आहे. कोल्हापूरपासून साधारणत: १२ किलोमीटरवर हे म्युझियम उभारण्यात आले आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचा एक नमुनाच इथे पाहायला मिळतो.  इथे पोहोचल्यानंतर तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात ती मेष, सिंह, कन्या अशी बारा राशींची शिल्पे त्यानंतर एका गुहेसदृश्य भागातून आत जाताच प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषी मुनींचे पुतळे इथे उभारण्यात आल्याचे दिसतात. प्रत्येक ऋषीचे नाव, त्यांची विद्या, त्यांचे योगदान यासह आवश्यक ती तसेच सर्वसामान्यांना माहित नसलेली माहितीही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
या गुहेतून बाहेर पडताच दोन्ही बाजूला समोर दिसतं ते हिरवागार शेत आणि या शेतात काम करणारी माणसं. इथूनच सुरू होतो तो खरा ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास. हळू हळू या माणसांच्या जवळ जाताच आपल्या लक्षात येतं की, ही माणसं नसून माणसांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखविण्यात आली आहे. याचसोबत शेतांमध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोर, लंगडी, सूर पारंब्या हे खेळ यांचे प्रत्यक्ष दर्शन घडविणाऱ्या या प्रतिकृती जीवंत वाटाव्यात इतके बारकावे यामध्ये टिपले आहेत. शेती आणि शेतकऱ्याचे काम याची ओळख करुन देणारा असा हा या म्युझियममधील भाग आहे. 
बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले तरी ही बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करुन देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. चांभार, लोहार, न्हावी, कोष्टी, कुंभार, शिंपी, सोनार यासह वासुदेव, पिंगळा यांची शिल्पेही त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवितात. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहुब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. इथल्या काडसिध्देश्वर महाराजांच्या मठात प्रवेश करताच मनाला एका अनामिक अशी शांतता लाभते.
शेतीमधील विविध प्रयोग पाहतानाच, देशी गाईंचे पालन करून निर्माण केले जाणारे सेंद्रिय खत, पालापाचोळा एकत्र करून केली जाणारी खात निर्मिती, आयुर्वेदाच महत्व सांगणार हॉस्पिटल, गुरुकुल पद्धतीची शाळा सार काही पुन्हा ग्रामीण परंतु आरोग्यदाई जीवनशैलीकडे घेऊन जाणारे येथील चित्र खरच आपल्या देशातील ग्रामीण लोकजीवन समृद्ध करणारे आहे. त्याचे अनुकरण केले पाहिजे. कणेरी मठातील दिवस कसा गेलं ते समजलच नाही. येथील ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास पुन्हा एकदा कोकणच्या गतकाळात घेऊन जात असतांना बारामतीच्या दिशेने बस निघाल्या रात्री आराम करून कृषी विज्ञान केंद्रातील आधुनिक  शेती विकासाच्या अभ्यासाला. 
दुसरा ८ जानेवारीचा दिवस उजाडला बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील शेतकरी निवासात. चहा, नाष्टा झाला आणि शेतकरी निवासाच्या मोकळ्या जागेत महिला भगिनींची मैफल जमली आणि सुरु झाला ओळखीचा कार्यक्रम. आधीच सगळ्यांची मैत्री झाली होती, ओळखीने आणखीन मजबूत झाली. अभियानाचे गीत गात आम्ही निघालो कृषी विज्ञान केंद्र पहायला. लोकनेते शरद पवार यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभ राहील आहे. देशात काही दशकांपुर्वी शेतीत यात्रीकीकरण आले. आधुनिक खते, बियाणे यांचा वापर होऊ लागला आणि शेतीची उत्पादकता वाढीस लागली. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करून शेत मळे बहरायला लागले. शेतीपूरक व्यवसायांनी शेतीला जोडधंदा मिळवून दिला. शेळी पालन, विविध जातीच्या गाईंचे पालन, शोभिवंत मासे निर्मिती, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन, वराह पालन असे विविध प्रकार शेतीला पूरक ठरू लागले. अत्यंत शास्त्रीय पद्धतीने हे सारे शेतीपूरक व्यवसाय कसे करावेत याचे अवलोकन अत्यंत जवळून बारामतीच्या या केंद्रात करता येते. आधुनिक अवजारे, उस लागवड, झेंडू लागवड, संत्रा लागवड, माडाच्या विविध जातींची लागवड, चिकू बाग, पपई बाग, केळींची लागवड, पेरू लागवड हि आणि यासारखी अनेक पिके कशी घ्यायची याची शस्त्रोक्त पद्धत बारामतीच्या या केंद्रात पहायला मिळते. बगयातीमधील आंतरपिके, कोणत्या बागेत कोणते पिक घ्यायचे याचा अभ्यास येथे करता आला. झेंडू सारख्या फुलांच्या लागवडीबरोबर पॉलीहाउस मधील फुल शेती अभ्यासता आली. परसातील शेती हा कोकणातील एक प्रकार आहे मात्र परस बागेत अत्यंत नियोजनबद्ध विवध भाज्यांचे उत्पन्न कसे घेता येते ते इथेच शिकावे. 
महिला भगिनींचा दौरा म्हटल्यावर देव दर्शन होणारच. बारामतीतून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघताना मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन करून जेजुरीच्या खंडोबा दरबारी दाखल झालो. गडावरचा तो गार वारा अंगाला झोंबत होता. त्यात खंडोबाची महती मन भारावून टाकत होती. येथील भंडारा डोकीला फासून रात्री आळंदीचा मार्ग धरला आणि वेध लागले ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाचे. ९ जानेवारीची पहाट होताच आवराआवर करून समाधिस्थळाकडे सर्वांची पावले वळू लागली, माऊलींचे दर्शन झाले. पुढे भेटणार होत्या शेतीच अभिनव दान महाराष्ट्राच्या पदरात टाकणाऱ्या आजच्या काळातील माऊली ज्ञानेश्वर बोडके. पुणेतील हिंजवडी लगतच्या माण गावात बोडके कुटुंबाचा फार्म आहे. या कुटुंबाने शेतीत केलेले प्रयोग निश्चितच नव्या वाटेवर घेवून जाणारे आहेत. बोडके यांनी स्वतःबरोबर अनेकांना पुढे नेल आहे. सेंद्रिय शेती काळाची गरज आहे हे त्यांनी पटवून देतानाच त्यातून मिळणाऱ्या आर्थिक नफ्याची जाणीवही लोकांना करून दिली आहे. माऊलीचं हे दान घेवून आम्ही परतीच्या प्रवासात निघालो, पुन्हा सिंधुदुर्गात. मागे फिरताना मग आठवू लागली ती आमची शेती आणि त्यासोबतच स्वताच आरोग्य. 
आमच्या कोकणात असंतुलित पद्धतीने शेतीचा उपयोग केला जातो. कोकणच्या आवश्यकतेनुसार पिकांचे उत्पादन केले जात नाही. पोटापुरतेच पीक घेतले जाते. सर्रास शेतकरी वर्ग शेतीपेक्षा चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर अधिक लक्ष देतो. त्यात सध्याच्या बँकिंग पद्धतीमुळे हे काम अगदी सोपे झाले आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन शेती असल्यामुळे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे कृषी अर्थशास्त्रात सांगितले आहे. मात्र आम्ही शेतीपासून दूर निघालो आहोत. दुसरीकडे स्वतःबरोबर जमिनीच्या आरोग्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. मनुष्याच्या स्वत:च्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व जमिनीच्या कसाला आहे. शेतकरी वर्ग प्रथम चांगल्या प्रतीची जमीन, मध्यम प्रतीची जमीन नंतर नापीक जमीन लागवडीखाली आणीत असतो. अलीकडील काळात जमिनीच्या कसाकडे कोकणातील शेतक-यांचे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. कारण अजूनही शेती ही निसर्गावर अर्थात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे उत्पादनामध्ये अनिश्चितपणा असतो. शेत जमिनीची उत्पादकता अनेक कारणांमुळे कमी होत आहे. त्याला अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यात  शेतीसाठी जमिनीचा अतिवापर करणे, बदलत्या परिस्थितीमुळे सेंद्रीय खतांकडे दुर्लक्ष करणे, माहितीच्या अभावामुळे रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अयोग्य वापर, आणि जमिनीची होणारी धूप न थांबविणे अशा अनेक कारणामुळे जमिनीचा ‘कस’ कमी होत चालला आहे. त्यामुळे जमिनीची पत बिघडत चालली आहे. म्हणून शेतकरी राजाला जमिनीच्या पतीविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आज देशातील उद्योगांचा विचार करता, शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक कमी आहे. सध्या जमिनीच्या वापराचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास आले की, जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जमिनी नापिक झाल्यानंतर शेतक-यांचे लक्ष जाते. तोपर्यंत जमीन ही अनुउत्पादक झालेली असते.शेतीक्षेत्र हे देशातील सर्वात जास्त रोजगार निर्मितीचे प्रमुख क्षेत्र आहे. शेतीची उत्पादकता कमी होत असल्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले. जमिनीचा कस वाढवून उत्पादन वाढविण्याच्या शेतकरी प्रयत्न करीत असतो आणि वाढत्या उत्पन्नाचा फायदा शेतक-यांना होतो. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी वाढत असते. मात्र त्याप्रमाणे पुरवठा केला जात नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येबरोबर कमी होत जाणारे शेती उत्पादन होय. हे लक्षात घेता अभिनव फार्मर क्लबने शेतीचे जे तंत्र विक्षित केले आहे त्या पद्धतीने शेती केल्यास कोकणातील शेतकरी सधन होऊ शकतो. तसेच तो भविष्यातील पिढीला आरोग्यदाई खाद्य देऊ शकतो. 
शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठया प्रमाणावर करताना दिसून येतात. परंतु काही पिकांची उत्पादनवाढ तात्पुरत्या स्वरुपाची किंवा काही काळासाठीच असते. याचे कारण असे की, आपण उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. परिणामी जर रासायनिक खतांना अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठयाप्रमाणावर द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच क्षारांचे प्रमाण वाढते; जमिनी खार वाटतात. रासायनिक खतांच्या अति वापरणे  शेतातल्या जमिनीमध्ये असणार्या. गांडुळांची संख्या कमी होते. कारण रासायनिक खत गांडूळाला मानवत नाही.  गांडूळ कमी झाले की, शेतातल्या मातीमध्ये असणारे कृमी, कीटक आणि रोगजंतू हे मोकाट सुटतात. कारण त्यांचा फडशा उडविणारे गांडूळ कमी झालेले असतात. त्यामुळे रासायनिक खत जितका जास्त वापरू तितके पिकांवर रोग जास्त पडायला लागतात.  ज्या शेतात रासायनिक खतांचा मारा केला जातो त्या शेतातल्या पिकांवर रोगही जास्त पडतात. म्हणजे रासायनिक खतांमुळे आधी खतांचा खर्च वाढतो आणि नंतर औषधांचे खर्चही त्या पाठोपाठ वाढायला लागतात. शेतांमधल्या पिकांवर औषधांचा मारा जास्त केला की, शेतातली पिके विषारी व्हायला लागतात. औषधे मारल्यामुळे अळ्या आणि लहानसहान कीडी मरतात हे खरे, परंतु अशा प्रकारे मरून पडलेल्या अळ्या किंवा किड्यांना खाण्यासाठी चिमण्या किंवा अन्य काही पक्षी शेतामध्ये यायला लागतात आणि अशा अळ्यांना खायला लागतात तेव्हा त्या अळ्या खाणारे पक्षी सुद्धा मरण पावतात. कारण त्या अळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारलेले औषध पक्ष्यांच्या पोटात जात असते. पक्ष्यांना सुद्धा बुद्धी असतेच. शेतातल्या अळ्या खाल्ल्यामुळे पक्षी मरत आहेत हे त्यांच्या लक्षात येते आणि ते पक्षी पुन्हा शेताकडे फिरकत नाहीत. हे पक्षी शेतामध्ये येत राहणे त्यांनी शेतातल्या अळ्या, कीडी खाणे आणि जाताना शेतात विष्ठा टाकून जाणे या गोष्टी शेतीतले नैसर्गिक चक्र फिरत राहण्यासाठी आवश्यक असते. परंतु हे पक्षी शेताकडे फिरकेनसे झाले की हे चक्र तुटते आणि शेताला आयतेच मिळणारे हे खत मिळेनासे होते आणि शेतातल्या किड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार औषधेच वापरावी लागतात. त्याचा परिणाम होऊन शेतातला खर्च वाढतो, पिके विषारी होतात आणि परिणामी पिकांचा दर्जाही घसरतो. आज शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व तृणनाशके इत्यादींचा वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व अन्न सुरक्षा वाढविणे आणि त्याच वेळी उत्पादन खर्चही कमी करणे. अशा दुहेरी दृष्टिकोनातून सेंद्रीय शेतीला उत्तेजन दिले जात आहे. अभिनव फार्मर क्लबनेही तेच काम हातात घेतले आहे. हेच मॉडेल कोकणात राबवणे शक्य आहे यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्याला रोजगार मिळेल शिवाय नोकरीसाठी मुंबईकडे जाण्याची गरज उरणार नाही. तेव्हा आम्ही निश्चय केलाय, तुम्हीही करा, सर्वांनी मिळून सेंद्रिय शेती करू आणि आपल्याबरोबर सर्वांचे पर्यायाने देशाचे आरोग्य सुधृढ घडवू. या सहलीतून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सिंधुदुर्ग विभागाने आम्हाला शेतीकडे नव्याने पाहण्याची जाणीव करून दिली त्याकरता त्यांचे खूप खूप आभार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 2977848
Designed and maintained by Leigia Solutions